नॅशनल हेराल्डची मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटीस   

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ६६१ कोटींची स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडला (एजेएल) शनिवारी नोटीस बजावली. 
 
या मालमत्तांमध्ये दिल्ली, मुंबई आणि लखनौ येथील प्रमुख व महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे.  दिल्लीतील आयटीओ येथील हेराल्ड हाऊस, मुंबईतील वांद्रे परिसरातील त्यांच्या परिसरात आणि लखनौमधील बिशेश्वर नाथ मार्गावरील एजेएल इमारतीत ईडीने नोटिसा चिकटवल्या आहेत. मुंबईतील मालमत्तेच्या बाबतीत जागा रिकामी करण्यास किंवा भाडे ईडीला देण्यास नोटीसमध्ये सांगितले आहे.आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्याच्या कलम (८) आणि नियम ५(१) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.  यामध्ये ईडीने जप्त केलेल्या आणि प्राधिकरणाने पुष्टी केलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्रदान केली आहे. 
 
या स्थावर मालमत्ता ईडीने नोव्हेंबर २०२३ मध्ये जप्त केल्या होत्या. ईडीचा हा आर्थिक अफरातफर खटला एजेएल आणि यंग इंडियनविरुद्ध आहे. नॅशनल हेराल्ड हे एजेएल द्वारे प्रकाशित केले जाते आणि ते यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचे आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे ’यंग इंडियन’चे प्रमुख भागधारक आहेत. त्यांच्याकडे प्रत्येकी ३८ टक्के समभाग आहेत. यंग इंडियन आणि एजेएलच्या मालमत्तेचा वापर १८ कोटींच्या बनावट देणग्या, ३८ कोटींचे बनावट आगाऊ भाडे आणि २९ कोटींच्या बनावट जाहिरातींच्या स्वरूपात गुन्हेगारी उत्पन्नासाठी करण्यात आला, असा आरोप ईडीचा आहे.

Related Articles